Wednesday, June 16, 2010

आभाळीच्या पाण्या...


येता येता ठेवलीस
बात आधी आधी...
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...

आणले होतेस थेंब
ओलेत्या घरून
रेशमी झाले
आभाळ भरून
मग कुठे थांबलं रे
सावळ पाउल...
आभाळाच्या तळ्यामध्ये
नाही रे चाहूल
गंजलेली पानं
तुला रानोमाळ शोधी
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...

दिवा गुलमोहोराचा
आहे लाल लाल..
आता हिरव्या पानांचा
हवाय सिग्नल...
वाळवंट ऋतूचे या
तुडवले पायी
काळ्या मेघांच्या विठूचे
दर्शनच न्हाई...
अंतरीची आस माझी
नाही साधी सुधी...
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...