Sunday, July 29, 2012

song...


.........................


कधी कधी गाता गाता समजत जातं गाणं
सांजवेळी समोर येतं उमजत जातं गाणं...

खिशात टाकून दाणे जसं अहेतुक फिरावं
तसं सुद्धा कधी कधी फिरत येतं गाणं
तिचं नाव नकळत ओठांवर येतं
नवं कोरं तरी बघ विरत जातं गाणं
सांजवेळी समोर येतं उमजत जातं गाणं...

घुमत जाते शीळ तसं ओठांवर येतं
मोजताना मात्रा कसं बोटांवर गातं
कधी ठेच कधी पेच फिरवतं पाठ
चहाच्या घोटाने अन् जमत जातं गाणं...

कधी उगा अक्षरांची गिर्रेबाज नक्षी
कधी ओल्या सुरांचाच निळाशार पक्षी
कधी मात्र अर्थ खोल खोल भिडतात
कागद होऊन मन जगत जातं गाणं....

Sunday, July 22, 2012

Monday, July 2, 2012

पाउस ब्येनं



हे पाउस ब्येनं लयी द्वाड
उगडून खिडक्या दारं सताड-
अंगात घुमतयं बेफाम वारं
माझ्याबी मनाची खोले कवाड
पाउस ब्येनं लयी द्वाड.....

आयशी त्याची का त्याला वराडत न्हायी?
छत्री घ्यायच्या आधीच येन्याची घाई?
कसा चर्चर् चुरचुर भजी खायाला
ओल्या पावली येतो लबाड.....
पाउस ब्येनं लयी द्वाड.....

कवा वा-याच्या सोबत येतो...
आन कवेत वादळ घेतो
लाटा उधाण मन तुफान
अन् लपतो जाऊन धुक्या च्या आड....
पाउस ब्येनं लयी द्वाड.....


यंदा रुसून बसला का वं?
आमचं इसरला का रे नाव...
आन थोड्याश्या बिया तुझ्याबी
इथे उगवू दे पान्याचं झाड...
पाउस ब्येनं लयी द्वाड.....

aabhaal




देहात झुके आभाळ एकदा
स्वप्नं पाखरे झाली
श्वासांची लय संथ सलगशी
निळाईत न्हाली

सुख उगवू आणि लागे मावळू
चंद्र आसवांचा
अन् व्यथाही माझी
बोलू लागली
चांदण्यांची बोली
श्वासांची लय संथ सलगशी
निळाईत न्हाली

मन मोठे झाले जणू असावी
फकीराची झोळी
आभाळ बिलगले आणि पापणी
अलगद ओली झाली....
श्वासांची लय संथ सलगशी
निळाईत न्हाली
मी परतून येता
अनोळखीसे
वाटू लागले लोक
बस ओळख तितकी आभाळाची
मनात माझ्या उरली...

.......................................................