
Friday, August 27, 2010
अनुभव...

लाल मखमली पेटीतला
पिढीजात बावनकशी हार
एखाद्या थरथरत्या हाताने
कुणा नाजुक गळ्यात घालावा...
तसे अनुभव नाही देता येत..एकाकडून दुस-याला...
शब्दांतून त्यांचा पोत जाणवू शकतो फार फार तर..
बाकी त्यातलं सारं संचित वेचावं लागतं आपलं आपल्यालाच...
सुखावणा-या दुखावणा-या गोंदणासारखं....
प्रत्येकीच्या सुख दुखाची वेगळीच चव...
आईच्या हातची वेगळी.. आजीची त्याहून वेगळी..
आपल्या हातच्या मसाल्याला नसते तशी...
वर्षांमागून सरत जातात वर्षं....
आणि आपल्याही सुख दुखाला आई आजीसारख्याच सुरकुत्या पडतात...
आपली नात किंवा मुलगी तेव्हा
तिच्या अनुभवांच्या पहिल्या वहिल्या गोंदणाने थरारत असते....
Wednesday, August 25, 2010

माणसं का नाही फुलवत मळे आणि बागा आपल्या घरात.....?
संस्कारांच्या कसदार मातीवर,
साधी साधी नाती कशी तरारून येतील मग...
अधून मधून होऊन जावी एखादी बाकायदा मैफिल...
हसण्याच्या लकेरींची,
गप्पांच्या विलंबित ख्यालांची,
दिल्या घेतल्या टाळ्यांच्या तालाची...
आठवणींची गाणी निघावी एखाद्या सुरकुतलेल्या गळ्यातून...
समाधानाची मंद आलापी झिरपत रहावी घरभर....
आपण सगळ्यांनीच न, असं करून पाहावं...
की अधून मधून सारे दिवे बंद करून,
उजळावी एक समई घरात...
पिवळसर प्रकाशात नक्की दिसेल...
भिंतींना चढलेला सौख्याचा रंग....
Subscribe to:
Posts (Atom)


