Thursday, September 22, 2011

पाउस



ढगांच्या गडगडाटातून येतो आवाज
वजनदार खोकल्यासारखा...
आणि फेसाळ धारांनी विणलेला प्रवाह
दिसू लागतो मग मफलरसारखा....
पाउस तेव्हा मला दिसतो आजोबांसारखा..
बालगंधर्वांच्या गाण्याची एखादी लकेर घेतात...
तेव्हा चमकते जणू लख्ख वीज..

पण परवा सकाळी,
लखलखीत उन माझी नजर वर होऊ देत नसताना..
स्कूल बस सुटलेल्या पोरीसारखा चेहरा झाला असताना....
एक काळा ढग आला समोर... काळ्या गॉगल सारखा...
पाउस समोर आला होता बाबांसारखा...
मला लिफ्ट दिली त्याने शाळेपर्यंत...
आणि बाय करून ऑफिसला गेला....

ओह... काल मात्र मी आणि समुद्र दोघं गप्पा मारत बसलो होतो...
आवडलं नाही त्याला...
त्यालाच...
पझेसिव पावसाला...
आला आला आला... दोन मिनिटं समुद्राशी तोंडदेखलं बोलला....
आणि बाईक ला किक मारून मला सरळ घेऊन गेला यार...

आणि आज सकाळी...
दार उघडलं तर पानांवरून टपटप गात होते थेंब,
त्यातूनच बहुतेक ऐकू येत होतं ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार......
धुक्याच्या दुपट्यात गुंडाळलेल्या पावसाची चुळबुळ सुरु होती,
उचलून कुशीत घेतलं तर दुपटं ओलं झालं होतं...
सुसू केली होती पावसाने...
त्याला आत घेऊन मी दार लावून घेतलं...
आता...
वाट पाहतेय स्वतःच पाउस होण्याची...

आई...



छई छप्पा छई छपाक छई


लहानपणी आपण डबक्यात नाचायचो एकत्र...

झाडं लावायचो नेमाने, आणि पाणी घालायचो न विसरता...


तू आलास की कणसं खायचो आणि भजी करायची आई...

खमंग...

आपण दारं उघडून मुक्त.......

छत्री न घेता सगळीकडे भटकत राहायचो रे...

दोघानाही सर्दी व्हायची...

आई मला औषध पाजायची...

तू मात्र शहाणा पळून जायचास...

रात्री आई झोपली की येऊन पुन्हा मला गच्चीवर न्यायचास....

तुझा हात धरल्यावर रात्रीच्या त्या गार अंधारातसुद्धा भीती नाही वाटली कधी...

काल रात्री माझी लेक नव्हती अंथरुणात, म्हणून धसकून उठले मी...

ती.. माझ्याचसारखी... तुझ्यासोबत.... गच्चीत नाचत होती पावसा...

तिने तुझा हात धरला होतं आणि तिला मुळीच भीती वाटत नव्हती गार अंधाराची...

मी सर्दीचं औषध काढून ठेवलं आणि....

भजी तळायला घेतली....

पावसा...

थालीपीठ



दोन मुठी भाजणीच पीठ, भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं तिखट आणि मीठ, बारीक चिरलेली मिरची आणि हो, पाणी गरम करून ओत... म्हणजे छान खुसखुशीत होतील तुझी थालीपीठं.... डायेट कॉन्शस नसशील तर तेल घाल व्यवस्थित... म्हणजे खमंग होतील.... कळलं न?

खिडकीत बसलेल्या पावसाने मान डोलावली....

थालीपीठाची रेसिपी लिहून घेत होता पाउस माझ्याकडून....

.................
त्याने मला भिजण्याची रेसिपी शिकवलीये...
...................पुन्हा केव्हातरी सांगेन.....


similar....



तू हवं तेव्हा येतोस..

थांब म्हटल्यावर जातोस....

चारचौघात बिलगतोस

पाणी पाणी करून टाकतोस...

तू अरेरावी करतोस, उद्धट आहेस तू...

मी रुसल्यावर लगट करतोस तू ....

पण इतका खोलवर उतरू शकतोस...

की आतून येणा-या श्वासांना तुझा गंध येऊ लागतो...

कोण आहेस तू...

पाउस की प्रियकर...

आणि....इतके कसे सारखे आहात तुम्ही...?

Sunday, September 11, 2011

शहर...


एक असावे आपले शहर...
जिथे माणसाना व्हावा आनंद -बिनंद दुस-यांच्या यशाने....
आणि तिरकस शे-यांच्या तत्परतेने ओठी यावं कौतुक- दुस-यांच्या कलाकृतींसाठी...
वितळून जावेत सा-यांच्या दारातले आकसाचे काटेरी निवडुंग...

आणि शोध लागावा "पोटदुखी"च्या वरच्या औषधाचा...

आयुष्याच्या तळ्यात पोहावेत निखळ नात्यांचे राजहंस...
आणि हातावरच्या घडाळ्यात दिसावा निवांत वेळ आपल्या माणसांसाठी...
दुस-याचं सकस असणं सहज मान्य करता याव, लहान मुलाच्या निरागसतेने...
आणि आपल्या जमिनीत जे उगवेल....त्याची मीठ भाकर लागावी गोड....

देवा...
माझ्या डोळ्यांतल्या पाण्याची भीती वाटते म्हणून तुझ्याकडे हे स्वप्न ठेवायला देतेय...
आज जातोयस तुझ्या शहरात परत.....
विसर्जनाच्या तळ्यात विरघळू देऊ नकोस....माझं हे शहर ......
...................................................


Monday, September 5, 2011

chaandanvel......


जेव्हा माणसं भेटतात...
तेव्हा आपण दुसरीकडे गुंतलो असतो....
रस्ते सापडतात तेव्हा आंपण already दुस-या वाटा निवडलेल्या असतात...
जेव्हा त्या वाटांपाशी येतो तेव्हा पावलं थकलेली असतात.........
जेव्हा पावलांत जोम येतो... तेव्हा न जाणे कुठली भिरभिरती फुलपाखरं वाटांवरून भटकत दूर नेतात...
जेव्हा पाउस पडणार असतो तेव्हा आपण भिजायला बाहेर पडणार नसतो....
जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा पाउस पडणार नसतो...
जेव्हा आठवण उतू जाते.....
तेव्हा मोबाईल ला रेंज नसते....
जेव्हा कॉल येतो तेव्हा आपण बिझी असतो....
जेव्हा आवाज तापला असतो तेव्हा तानपुरा लागतं नाही,
आणि जेव्हा तारा जुळलेल्या असतात-
संध्याकाळ तेव्हा सरून गेली असते................
कुठवर चालणार हा पाठशिवणीचा खेळ....
सुख क्षणांनो कधीतरी गाठाल का चांदणवेळ???

- अश्विनी