छई छप्पा छई छपाक छई
लहानपणी आपण डबक्यात नाचायचो एकत्र...
झाडं लावायचो नेमाने, आणि पाणी घालायचो न विसरता...
तू आलास की कणसं खायचो आणि भजी करायची आई...
खमंग...
आपण दारं उघडून मुक्त.......
छत्री न घेता सगळीकडे भटकत राहायचो रे...
दोघानाही सर्दी व्हायची...
आई मला औषध पाजायची...
तू मात्र शहाणा पळून जायचास...
रात्री आई झोपली की येऊन पुन्हा मला गच्चीवर न्यायचास....
तुझा हात धरल्यावर रात्रीच्या त्या गार अंधारातसुद्धा भीती नाही वाटली कधी...
काल रात्री माझी लेक नव्हती अंथरुणात, म्हणून धसकून उठले मी...
ती.. माझ्याचसारखी... तुझ्यासोबत.... गच्चीत नाचत होती पावसा...
तिने तुझा हात धरला होतं आणि तिला मुळीच भीती वाटत नव्हती गार अंधाराची...
मी सर्दीचं औषध काढून ठेवलं आणि....
भजी तळायला घेतली....
पावसा...

No comments:
Post a Comment