.........................
कधी कधी गाता गाता समजत जातं गाणं
कधी कधी गाता गाता समजत जातं गाणं
सांजवेळी समोर येतं उमजत जातं गाणं...
खिशात टाकून दाणे जसं अहेतुक फिरावं
तसं सुद्धा कधी कधी फिरत येतं गाणं
तिचं नाव नकळत ओठांवर येतं
नवं कोरं तरी बघ विरत जातं गाणं
सांजवेळी समोर येतं उमजत जातं गाणं...
घुमत जाते शीळ तसं ओठांवर येतं
मोजताना मात्रा कसं बोटांवर गातं
कधी ठेच कधी पेच फिरवतं पाठ
चहाच्या घोटाने अन् जमत जातं गाणं...
कधी उगा अक्षरांची गिर्रेबाज नक्षी
कधी ओल्या सुरांचाच निळाशार पक्षी
कधी मात्र अर्थ खोल खोल भिडतात
कागद होऊन मन जगत जातं गाणं....



.jpg)


