Friday, May 18, 2012

आरपार...


माणसं पाहायला शिकतात एकमेकांच्या आरपार...
तेव्हा काय दिसत असेल त्यांना...?
दिसत असतील का पलीकडचे अंधारकण?
का दिसत असतील सरलेल्या सोनेरी क्षणांचे
झगमगते सण.....?
दिसत असतील का कधी काळी धरलेले हात
गच्चीत जागवलेली कोजागिरीची रात...?
विरजणासाठी मागून नेलेलं दही...
पालकांची केलेली खोटी सही..
रद्दीतून बाजूला काढून परत केलेली
कवितांची वही....
आंधळी कोशिंबीर खेळताना नेमकं माणूस हाताला लागणं...
समोरच्या खिडकीतल्या चंद्रासाठी रात्रभर जागणं...
खेळताना मित्राने आपल्यासाठी हारणं...
आणि त्याला उशीर झाला म्हणून आपण त्याच्या आईला दिलेली कारणं....
मैत्रीच्या झाडाखाली पडत राहतात रोज आठवणींची ताजी फुलं...
मग झाडं का वठतात?
माणसं पाहायला शिकतात एकमेकांच्या आरपार...
तेव्हा काय दिसत असेल त्यांना...?
त्यांना दिसत असेल न टळणारी जाणीव...
की आपण विसरू शकत नाही आपल्या माणसांना....
ते मान्य करण्याचा रस्ता फार लांब नाही...
तो एकदा चालून गेलं की रिमझिमणारं गाव समोर उभं आहे...




No comments: