Sunday, May 30, 2010

dagh daatuni yetaat...




हवेतला उकाडा रक्तातल्या उष्ण लाटांशी स्पर्धा करत असतो.. उन्हं पिऊन तहान भागवायचे दिवस.. आणि अचानक मनातल्या रिमझिम गावातून एक पत्र येतं.. त्या पत्रातला मजकूर ज्यांना कळू शकतो, ते वर पाहतात.. आभाळ भरून आलेलं असतं..

आभाळ भरून येतं, पण बरसत नाही.. बर्फाच्या रवाळ चुऱ्यासारखं दिसणाऱ्या थंडगार आभाळाचं हे मौन समजून घ्यायला मातीचं काळीज लागतं. ते रुसलंय का.. का नुसतंच अबोल आहे.. खूप काही सांगायचंय थेंबांतून पण त्यालाही मिळत नाहीयेत हवे तसे थेंब म्हणून ते थिजलंय बर्फासारखंच..? भरून आलेल्या आभाळात पाण्याचा प्रवाहीपणा कुठून असणार? त्याच्या गोठण्याला आपल्या वाट पाहण्याची ऊब द्यावी लागतेय.. आणि इथेच बऱ्याच जणांचा लाकूडफाटा संपतो..

शहराच्या अल्बममधल्या गेल्या पावसाळ्याच्या ओल्या आठवणी पुसल्या जाऊ लागल्या की, मग आभाळ भरून येतं. पाखरं तारेवर बसून माना वर करून पाहात राहतात आकाशाकडे.. हो, आकाशाकडे.. एरव्हीचं असतं ते आकाश.. ते भरून आलं की मगच होतं त्याचं ‘आभाळ’.. वाऱ्याचे श्वास ओलसर होतात तेव्हा आभाळ भरून येतं.. किंवा उलटही असेल.. वास्तविक काय वय असेल या वाऱ्याचं.. लोण्यागत मऊ होणाऱ्या मातीचं.. ओल्या नाण्यांसारख्या वाजणाऱ्या थेंबांचं..? आणि हे सगळे ज्याच्या एका नजरेच्या इशाऱ्याने शहारतात त्या आभाळाचं?

निसर्गाचं गूढ माणसांना उकलणार नाही असं वचन निसर्गानं दिलं असावं कुणालातरी.. त्याशिवाय आभाळ नावाचं हे कोडं जन्मालाच नसतं आलं. या कोडय़ाला शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो माणसाकडे.. तसंही प्रेमात पडल्यावर शरण जाणं हाच सर्वात सुंदर पर्याय असतो.. आणि पावसाच्या पर्यायाने आभाळाच्या प्रेमात कोण नसतं..? तसं नसलेल्या माणसाने उन्हात बसून वितळून जावं.. कारण अशा माणसांना डोळ्यातल्या पाण्याचे आणि आभाळातल्या गाण्याचे संदर्भ कळूच शकत नाहीत.. त्यातही गंमत अशी आहे की प्रेमात पडलो की वाट पाहाणं हेच एक गाणं बनून जातं.. ते ज्याला गाता येतं त्याचा सारा प्रवास आनंदयात्रा होऊन जातो.. कारण वाट पाहण्याला प्रेमात पर्याय नाही- स्वप्नं दाखवणाऱ्या मुखडय़ाची वाट पाहावी, नजर चंदनी करून टाकणाऱ्या आभाळाच्या तुकडय़ाची वाट पाहावी.. कामं करायला निघून गेलेली आई परत येते आणि निजलेल्या बाळमुठीत आपलं बोट देते तसं आभाळ आपला सावळा पदर आसुसलेल्या बालमुठीत देतं. मलूल दुपारी माणसांच्या मनाच्या फांदीवर उतरतं..

जाणिवांच्या जरी उकाडा सलत असला तरी प्रत्येकाच्याच नेणिवांच्या राज्यात हे भरलेलं आभाळ वस्ती करून असतं.. ते जेव्हा येतं तेव्हा अचानक ऐकू आलेल्या गुलजारच्या गीतांसारखं हळवं करतं.. आस लावतं, अस्वस्थ करतं आणि दिलासाही देतं.. श्वासांत पाऊस आणि नजरेत ओले मेघ पेरतं.. सुकत चाललेल्या प्राण्यांच्या गाभ्यात जे आशेचे चुकार थेंब घालतं त्या आभाळाच्या भरून येण्याची वाट पाहताना कसलीच खंत नसते.. नसलीच पाहिजे, कारण ते जेव्हा भरून येतं, त्याच्या श्यामल मिठीत अवघं आयुष्य नाहातं. मग भलेही त्याने कितीही वाट पाहायला लावलेली असते..पावसाच्या मुक्कामी जायची वाट या भरल्या आभाळाच्या गावातूनच जाते.. त्या वाटेकडे जायचे असेल तर या सावळ्या संकेतांची वाट पाहाण्याला पर्याय नाही.. आणि खरं सांगायचं तर.. त्याच्यासारखे सुखही नाही..

Friday, May 28, 2010



सूर्याची किरणं बरसत राहतात...
समुद्राच्या मीलनोत्सुक लाटांवर
...आणि आवेग सहन करत त्यांचा
त्या तापत राहतात-
निसर्ग चक्र फिरतच रहातं....
आणि मग डोहाळे लागतात,
भिजण्याचे... भिजवण्याचे...
ढगांच्या तोंडावर दिसू लागतं
मग आगळंच तेज...
आणि लख्ख चमकणा-या विजेच्या वेणा सोसत...
जडावलेल्या नभांतून...
पावसाचं बाळ बाहेर येतं ...
उपडं पडतं... रांगू लागतं... दुडदुडु लागतं...
थेंबातून पाउस बाळ निरागस हसू लागतं....