Friday, December 24, 2010

tujhe sab hai pata...... meri maa.....


आईच्या हातावर एटीएम मधून
ठेवते पैसे काढून ...
हसून जराशी म्हणते कशी.
"जरा वेळही withdraw कर त्या मशीन मधून..."

इतरांना करून देताना मेकप-
आठवत राहतो तिचा नितळ चेहरा..
तरी... हल्ली सुरकुत्या पडत चालाल्यायेत...
समाधानाच्या...

इतरांसाठी लिहिताना संवाद...
माझ्या शब्दां शब्दांतून मलाच भेटत राहते...
समोरचं पात्र बोलू लागलं
की चमकून माझ्याकडे पाहते...

मुक्त पावलं थिरकतात माझी...
जेव्हा नव्या जुन्या बोलांवर...
तिच्या कपाटात एकदा घुंगरू सापडले होते...
आठवत राहातं खोलवर...

आणि जेव्हा काहीसं अपुरं
चित्र उरतं canvas वर
आई सहज सुचवून जाते बदल
जिथे अडले असते मी तासभर...

"बाळा तू आहेस माझ्या अतृप्त इच्छांचं तृप्त रूप..."
म्हणाली होतीस तू एकदा मला...
पण तू कोण आहेस आई?...
माझ्या कालच्या पालवीची टवटवी
आजही कशी अंकुरते तुझ्या हिरव्या हसण्यातून...
माझ्या आयुष्यातल्या सगळ्या भेगा...
कशा सहज भरून काढतेस ग...
माझ्याकडून मात्र गेले कित्येक हिवाळे..
अजूनही अमृत मलम आणायचं राहून जातंय...

Sunday, December 5, 2010

UnTouched.....



पुस्तक... तुझ्या घरात.. न वाचलेलं...
असा कसा रे तू...?
एक स्पर्श न केलेलं पुस्तक कसं असू शकतं कोणाच्या घरात?
त्याच्या पानां-पानांत फडफडत होती आतुरता व्याकुळता ..
चल ना... उमटवू त्याच्यावर आपल्या स्पर्शांचे ठसे...
वाचता वाचता त्यालाही कुशीत घेउन झोपल्याच्या खुणा...
अचानक वेगळंच काहीतरी करायला, बोलायला सांगायला लागलो म्हणून
त्याला उपडं ठेउन दिल्याच्या आठवणी...असू देत त्याच्याहीपाशी...
त्याच्या को-या पानांचा गंध भरून घेऊ श्वासांत...
खाता खाता वाचण्याचा शौक... वाचलं जाताना खाण्याचा शौक.... त्याला ही लावू...
उमटू देत त्याच्या पानांवर चॉकलेट केक चे गंध आणि मिसळीचे डाग....
.............................
आता ते पुस्तक तृप्त दिसतंय....
दुमडले गेलेयत त्याच्या अधल्या मधल्या पानांचे कोपरे...
अन मधूनच सापडतंय बुकमार्क म्हणून ठेवलेलं जितं जागतं पिंपळ पान ...
....... पुस्तक... तुझ्या घरात...... एखाद्याच्या शरीराइतकं ओळखीचं...
...........................................

Tuesday, November 30, 2010

magic....





हात तुटून पडतील इतकं काम... माझ्यासमोर...
पाय तुटून पडतील इतकं ट्राफिक.. त्याच्यासमोर...
एकमेकाना मनोमन सॉरी म्हणत आम्ही आपापल्या बाजूने जीव खाऊन धावत, खाणं तोंडात कोंबत त्या जादुई नगरीच्या दारात येउन पोचतो...
सुरुवात चुकली नसू दे अशी प्रार्थना करत आत शिरतो आणि हुश्श करुन रेड लाउंज च्या गुबगुबीत सोफ्यात अंग टाकतो तेव्हा स्क्रीन वर "plz stand up for national anthem " दिसतं..
एकदाचे आम्ही फायनली सेटल होतो... आणि मग पुढचे २ अडीच तास फक्त जादू असते,
पाउस असतो, धुकं असतं, वाळवंट असतं, जंगल असतं....
लाल रेशमी पडदे असतात... पाचूसारखी हिरवी रानं असतात, निळसर आकाश असतो, उन्हाचं सोनं लखलखत असतं...
Emotions... moments, magic, tears fears, cry shy, senti, smiles, laughter n love....
70 mm च्या त्या स्क्रीन वर आम्ही आम्हाला शोधत असतो...
समोर कोणी कोणाला जवळ घेतं, किस करतं, पाठ फिरवत निघून जातं,
खट्याळपणा करतं, लाजतं, रागावतं...
त्या सगळ्यात आम्ही आम्हाला पाहत असतो...
जे आमच्या आयुष्यात घडतं ते समोर दिसलं तर आम्ही रिलेट करतो,
जे घडू शकत नाही ते दिसलं की आम्ही imagine करतो....
त्या अडीच तासात आम्ही आमचे सगळे प्रॉब्लेम्स, त्रास, कटकटी, भांडण सगळ विसरलेलो असतो....
दरवेळी, एक नवी फिल्म, आम्हाला आधीपेक्षा जवळ आणते,,,,
कासावीस करते, विचार करायला लावते, पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडायला लावते...
..........................
बाहेर आलो की लख्ख उजेड असतो, डोळे दिपतात क्षणभर,,
तरी थिएटर मधल्या अंधारात दिसलेली स्वप्न अजून रेंगाळली असतात...
डोळ्यात असतात salted आसू..
आणि ओठांवर caramel popcorn इतकं गोड हसू...
................................

कितीही तंगी, कडकी महागाई आली,
कितीही काटकसर करावी लागली,
तरी वाटेल तेव्हा वाटेल ती फिल्म बघण्याइतके पैसे
नक्की कमावणार मी...
कमवू आम्ही...
.............................

Thursday, November 25, 2010

अंतर...


समोर बसला आहेस माझ्या...
कोराकरकरीत... नव्या पुस्तकाच्या गंधाइतका अस्पर्श...
हात लावावासा वाटत नाहिये अजुन...
कारण खूप अनोळखी वाटतो आहेस अजून...
इतक्या जुन्या मैत्रीच्या स्पर्शखुणा....
मागे पडल्यायत ...
जुन्या गोधडीची उब आठवणीत राहून जावी फक्त... तशा...
पहाटे विरून जावा चंद्रप्रकाश आणि सीमारेषेवर अंधार उजेडाच्या...
लख्ख काहीच दिसू नये...
तसं झालाय बघ सगळ....
तुला समजून घेण्यासाठी.
आता मला आधार घ्यावा लागतोय,
जाणिवांच्या शब्दकोशाचा...
एकेका शीरेतून रक्ताऐवजी तुझे शब्द वाहायचे दिवस पुन्हा यायला...
वेळ लागणारे अजून....
(* गुलझारचं रात पश्मिने की वाचायच्या आधी, उर्दू डिक्शनरीच्या शोधात होते, तेव्हा सुचलेली...)


Saturday, October 23, 2010

uttar




पाउस ऐन भरात येतो...
आणि मग एखादी पावसाळी संध्याकाळ
दुखावणारे हिशोब मागत उभी राहते दारात....
प्रत्येक सर आतून ओलं करून जाते डोळ्यांना...
खूप एकटं वाटतं...
एकटं असतानाही ... आणि नसतानाही...
वायपर्स फिरत राहतात हातातल्या कामाचे...
तरी मनाच्या काचेवर ओघळत राहतो आशाचा आवाज...
" बुला राहा ही कौन मुझको चिलमनो के उस तरफ....
मेरे लिये भी क्या कोई... उदास बेकरार है.....?
"कुठे असशील तू आत्ता...?
आणि जिथे असशील तिथे असशील का माझ्याइतकाच व्याकुळ....?

उत्तर मिळालं मला....

पाउस वाढलाय बाहेरचा.......................................


Friday, October 15, 2010

NAVIN MAITRIN....ALKA..



कुठून कुठे पिसासारखी
तरंगत येतात नाती...
कुठले मेघ, कुठल्या सरी
ओलावते माती...
तुझ्या नावाचे पाखरू,
आले कुठूनी उडून...
त्याची शीळ बोलकी,
मनात आलीये रुजून...
रस्ता माझा तुझ्याच
मुक्कामी जातो का ग
कोण्या काळी एकाच
गावच्या होतो का ग..
माहित नाही येऊन तूच
सोडव ही कोडी,
ये, नाहीतर बोलाव,
वाट पाहते मी वेडी...
...............................

Friday, August 27, 2010

आपण....


.......

मन


अनुभव...


लाल मखमली पेटीतला
पिढीजात बावनकशी हार
एखाद्या थरथरत्या हाताने
कुणा नाजुक गळ्यात घालावा...
तसे अनुभव नाही देता येत..एकाकडून दुस-याला...
शब्दांतून त्यांचा पोत जाणवू शकतो फार फार तर..
बाकी त्यातलं सारं संचित वेचावं लागतं आपलं आपल्यालाच...
सुखावणा-या दुखावणा-या गोंदणासारखं....
प्रत्येकीच्या सुख दुखाची वेगळीच चव...
आईच्या हातची वेगळी.. आजीची त्याहून वेगळी..
आपल्या हातच्या मसाल्याला नसते तशी...
वर्षांमागून सरत जातात वर्षं....
आणि आपल्याही सुख दुखाला आई आजीसारख्याच सुरकुत्या पडतात...
आपली नात किंवा मुलगी तेव्हा
तिच्या अनुभवांच्या पहिल्या वहिल्या गोंदणाने थरारत असते....

Wednesday, August 25, 2010



माणसं का नाही फुलवत मळे आणि बागा आपल्या घरात.....?
संस्कारांच्या कसदार मातीवर,
साधी साधी नाती कशी तरारून येतील मग...
अधून मधून होऊन जावी एखादी बाकायदा मैफिल...
हसण्याच्या लकेरींची,
गप्पांच्या विलंबित ख्यालांची,
दिल्या घेतल्या टाळ्यांच्या तालाची...
आठवणींची गाणी निघावी एखाद्या सुरकुतलेल्या गळ्यातून...
समाधानाची मंद आलापी झिरपत रहावी घरभर....
आपण सगळ्यांनीच न, असं करून पाहावं...
की अधून मधून सारे दिवे बंद करून,
उजळावी एक समई घरात...
पिवळसर प्रकाशात नक्की दिसेल...
भिंतींना चढलेला सौख्याचा रंग....
Posted by Picasa

Friday, July 16, 2010


सहज म्हणता म्हणता,कठीण होउन जातं सारं,
विचारांची पिसं उड़वतं,तुझ्या एका स्पर्शाचं वारं....
वा-यासोबत जायचं तर,जमिनीवर नाही राहात पाय,
पण तू वजा केल्यावर,आयुष्य मग उरतच काय....
वजाबाकी भागाकार, बेरीज अन गुणाकार,
थकलेय हिशोब मांडताना..
तुझ्याशी, तुझ्याशिवाय,नशिबाशी भांडताना...
एकदाच ये अन घेउन जा,
गुलजारच्या शब्दांच्या राज्यात..
देहातला पाउस, थांबलाय केव्हाचा,
आता थांबत नाही आत...
माहितीये मला, या रस्त्याला,परतीची वाट नाय....
पण तू वजा केल्यावर,आयुष्य मग उरतच काय....

Wednesday, June 16, 2010

आभाळीच्या पाण्या...


येता येता ठेवलीस
बात आधी आधी...
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...

आणले होतेस थेंब
ओलेत्या घरून
रेशमी झाले
आभाळ भरून
मग कुठे थांबलं रे
सावळ पाउल...
आभाळाच्या तळ्यामध्ये
नाही रे चाहूल
गंजलेली पानं
तुला रानोमाळ शोधी
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...

दिवा गुलमोहोराचा
आहे लाल लाल..
आता हिरव्या पानांचा
हवाय सिग्नल...
वाळवंट ऋतूचे या
तुडवले पायी
काळ्या मेघांच्या विठूचे
दर्शनच न्हाई...
अंतरीची आस माझी
नाही साधी सुधी...
आभाळीच्या पाण्या
तुला लागली समाधी...



Sunday, May 30, 2010

dagh daatuni yetaat...




हवेतला उकाडा रक्तातल्या उष्ण लाटांशी स्पर्धा करत असतो.. उन्हं पिऊन तहान भागवायचे दिवस.. आणि अचानक मनातल्या रिमझिम गावातून एक पत्र येतं.. त्या पत्रातला मजकूर ज्यांना कळू शकतो, ते वर पाहतात.. आभाळ भरून आलेलं असतं..

आभाळ भरून येतं, पण बरसत नाही.. बर्फाच्या रवाळ चुऱ्यासारखं दिसणाऱ्या थंडगार आभाळाचं हे मौन समजून घ्यायला मातीचं काळीज लागतं. ते रुसलंय का.. का नुसतंच अबोल आहे.. खूप काही सांगायचंय थेंबांतून पण त्यालाही मिळत नाहीयेत हवे तसे थेंब म्हणून ते थिजलंय बर्फासारखंच..? भरून आलेल्या आभाळात पाण्याचा प्रवाहीपणा कुठून असणार? त्याच्या गोठण्याला आपल्या वाट पाहण्याची ऊब द्यावी लागतेय.. आणि इथेच बऱ्याच जणांचा लाकूडफाटा संपतो..

शहराच्या अल्बममधल्या गेल्या पावसाळ्याच्या ओल्या आठवणी पुसल्या जाऊ लागल्या की, मग आभाळ भरून येतं. पाखरं तारेवर बसून माना वर करून पाहात राहतात आकाशाकडे.. हो, आकाशाकडे.. एरव्हीचं असतं ते आकाश.. ते भरून आलं की मगच होतं त्याचं ‘आभाळ’.. वाऱ्याचे श्वास ओलसर होतात तेव्हा आभाळ भरून येतं.. किंवा उलटही असेल.. वास्तविक काय वय असेल या वाऱ्याचं.. लोण्यागत मऊ होणाऱ्या मातीचं.. ओल्या नाण्यांसारख्या वाजणाऱ्या थेंबांचं..? आणि हे सगळे ज्याच्या एका नजरेच्या इशाऱ्याने शहारतात त्या आभाळाचं?

निसर्गाचं गूढ माणसांना उकलणार नाही असं वचन निसर्गानं दिलं असावं कुणालातरी.. त्याशिवाय आभाळ नावाचं हे कोडं जन्मालाच नसतं आलं. या कोडय़ाला शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो माणसाकडे.. तसंही प्रेमात पडल्यावर शरण जाणं हाच सर्वात सुंदर पर्याय असतो.. आणि पावसाच्या पर्यायाने आभाळाच्या प्रेमात कोण नसतं..? तसं नसलेल्या माणसाने उन्हात बसून वितळून जावं.. कारण अशा माणसांना डोळ्यातल्या पाण्याचे आणि आभाळातल्या गाण्याचे संदर्भ कळूच शकत नाहीत.. त्यातही गंमत अशी आहे की प्रेमात पडलो की वाट पाहाणं हेच एक गाणं बनून जातं.. ते ज्याला गाता येतं त्याचा सारा प्रवास आनंदयात्रा होऊन जातो.. कारण वाट पाहण्याला प्रेमात पर्याय नाही- स्वप्नं दाखवणाऱ्या मुखडय़ाची वाट पाहावी, नजर चंदनी करून टाकणाऱ्या आभाळाच्या तुकडय़ाची वाट पाहावी.. कामं करायला निघून गेलेली आई परत येते आणि निजलेल्या बाळमुठीत आपलं बोट देते तसं आभाळ आपला सावळा पदर आसुसलेल्या बालमुठीत देतं. मलूल दुपारी माणसांच्या मनाच्या फांदीवर उतरतं..

जाणिवांच्या जरी उकाडा सलत असला तरी प्रत्येकाच्याच नेणिवांच्या राज्यात हे भरलेलं आभाळ वस्ती करून असतं.. ते जेव्हा येतं तेव्हा अचानक ऐकू आलेल्या गुलजारच्या गीतांसारखं हळवं करतं.. आस लावतं, अस्वस्थ करतं आणि दिलासाही देतं.. श्वासांत पाऊस आणि नजरेत ओले मेघ पेरतं.. सुकत चाललेल्या प्राण्यांच्या गाभ्यात जे आशेचे चुकार थेंब घालतं त्या आभाळाच्या भरून येण्याची वाट पाहताना कसलीच खंत नसते.. नसलीच पाहिजे, कारण ते जेव्हा भरून येतं, त्याच्या श्यामल मिठीत अवघं आयुष्य नाहातं. मग भलेही त्याने कितीही वाट पाहायला लावलेली असते..पावसाच्या मुक्कामी जायची वाट या भरल्या आभाळाच्या गावातूनच जाते.. त्या वाटेकडे जायचे असेल तर या सावळ्या संकेतांची वाट पाहाण्याला पर्याय नाही.. आणि खरं सांगायचं तर.. त्याच्यासारखे सुखही नाही..

Friday, May 28, 2010



सूर्याची किरणं बरसत राहतात...
समुद्राच्या मीलनोत्सुक लाटांवर
...आणि आवेग सहन करत त्यांचा
त्या तापत राहतात-
निसर्ग चक्र फिरतच रहातं....
आणि मग डोहाळे लागतात,
भिजण्याचे... भिजवण्याचे...
ढगांच्या तोंडावर दिसू लागतं
मग आगळंच तेज...
आणि लख्ख चमकणा-या विजेच्या वेणा सोसत...
जडावलेल्या नभांतून...
पावसाचं बाळ बाहेर येतं ...
उपडं पडतं... रांगू लागतं... दुडदुडु लागतं...
थेंबातून पाउस बाळ निरागस हसू लागतं....

Friday, April 16, 2010

Tuesday, April 13, 2010


आठवणींचा चहा...
निवांत क्षणांची गवती पाती ...
आणि तुझ्या नावाची साखर...
आयुष्याला तरतरी येते मग....
कुठे असतोस तू त्यावेळी..
तुझ्या मनाच्या तळ्यात
कधी पोहतात का रे
माझ्या आठवणींचे
शुभ्र राजहंस?
माहीत नाही मला.
माझ्या दिवसाच्या रानात मात्र
तू माझा असल्याची जाणीव
वा-यासारखी सळसळत असते... सतत..
अखेर संध्याकाळ होते...
तुझ्या सावलीचा गारवा पसरतो माझ्या देहाच्या दारात...
आणि प्राण चिंब होत जातात तुझ्या स्पर्शाच्या थेंबांत...
............
आठवणींचा चहा...
निवांत क्षणांची गवती पाती ...
आणि तुझ्या नावाची साखर...
... साखर थोड़ी ओली झालीये का...?