Friday, December 24, 2010

tujhe sab hai pata...... meri maa.....


आईच्या हातावर एटीएम मधून
ठेवते पैसे काढून ...
हसून जराशी म्हणते कशी.
"जरा वेळही withdraw कर त्या मशीन मधून..."

इतरांना करून देताना मेकप-
आठवत राहतो तिचा नितळ चेहरा..
तरी... हल्ली सुरकुत्या पडत चालाल्यायेत...
समाधानाच्या...

इतरांसाठी लिहिताना संवाद...
माझ्या शब्दां शब्दांतून मलाच भेटत राहते...
समोरचं पात्र बोलू लागलं
की चमकून माझ्याकडे पाहते...

मुक्त पावलं थिरकतात माझी...
जेव्हा नव्या जुन्या बोलांवर...
तिच्या कपाटात एकदा घुंगरू सापडले होते...
आठवत राहातं खोलवर...

आणि जेव्हा काहीसं अपुरं
चित्र उरतं canvas वर
आई सहज सुचवून जाते बदल
जिथे अडले असते मी तासभर...

"बाळा तू आहेस माझ्या अतृप्त इच्छांचं तृप्त रूप..."
म्हणाली होतीस तू एकदा मला...
पण तू कोण आहेस आई?...
माझ्या कालच्या पालवीची टवटवी
आजही कशी अंकुरते तुझ्या हिरव्या हसण्यातून...
माझ्या आयुष्यातल्या सगळ्या भेगा...
कशा सहज भरून काढतेस ग...
माझ्याकडून मात्र गेले कित्येक हिवाळे..
अजूनही अमृत मलम आणायचं राहून जातंय...

Sunday, December 5, 2010

UnTouched.....



पुस्तक... तुझ्या घरात.. न वाचलेलं...
असा कसा रे तू...?
एक स्पर्श न केलेलं पुस्तक कसं असू शकतं कोणाच्या घरात?
त्याच्या पानां-पानांत फडफडत होती आतुरता व्याकुळता ..
चल ना... उमटवू त्याच्यावर आपल्या स्पर्शांचे ठसे...
वाचता वाचता त्यालाही कुशीत घेउन झोपल्याच्या खुणा...
अचानक वेगळंच काहीतरी करायला, बोलायला सांगायला लागलो म्हणून
त्याला उपडं ठेउन दिल्याच्या आठवणी...असू देत त्याच्याहीपाशी...
त्याच्या को-या पानांचा गंध भरून घेऊ श्वासांत...
खाता खाता वाचण्याचा शौक... वाचलं जाताना खाण्याचा शौक.... त्याला ही लावू...
उमटू देत त्याच्या पानांवर चॉकलेट केक चे गंध आणि मिसळीचे डाग....
.............................
आता ते पुस्तक तृप्त दिसतंय....
दुमडले गेलेयत त्याच्या अधल्या मधल्या पानांचे कोपरे...
अन मधूनच सापडतंय बुकमार्क म्हणून ठेवलेलं जितं जागतं पिंपळ पान ...
....... पुस्तक... तुझ्या घरात...... एखाद्याच्या शरीराइतकं ओळखीचं...
...........................................