
ढगांच्या गडगडाटातून येतो आवाज
वजनदार खोकल्यासारखा...
आणि फेसाळ धारांनी विणलेला प्रवाह
दिसू लागतो मग मफलरसारखा....
पाउस तेव्हा मला दिसतो आजोबांसारखा..
बालगंधर्वांच्या गाण्याची एखादी लकेर घेतात...
तेव्हा चमकते जणू लख्ख वीज..
पण परवा सकाळी,
लखलखीत उन माझी नजर वर होऊ देत नसताना..
स्कूल बस सुटलेल्या पोरीसारखा चेहरा झाला असताना....
एक काळा ढग आला समोर... काळ्या गॉगल सारखा...
पाउस समोर आला होता बाबांसारखा...
मला लिफ्ट दिली त्याने शाळेपर्यंत...
आणि बाय करून ऑफिसला गेला....
ओह... काल मात्र मी आणि समुद्र दोघं गप्पा मारत बसलो होतो...
आवडलं नाही त्याला...
त्यालाच...
पझेसिव पावसाला...
आला आला आला... दोन मिनिटं समुद्राशी तोंडदेखलं बोलला....
आणि बाईक ला किक मारून मला सरळ घेऊन गेला यार...
आणि आज सकाळी...
दार उघडलं तर पानांवरून टपटप गात होते थेंब,
त्यातूनच बहुतेक ऐकू येत होतं ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार......
धुक्याच्या दुपट्यात गुंडाळलेल्या पावसाची चुळबुळ सुरु होती,
उचलून कुशीत घेतलं तर दुपटं ओलं झालं होतं...
सुसू केली होती पावसाने...
त्याला आत घेऊन मी दार लावून घेतलं...
आता...
वाट पाहतेय स्वतःच पाउस होण्याची...
No comments:
Post a Comment