Saturday, February 16, 2013

muhurt...


जेव्हा झुंजतो मी शर्थीने..
जिवलगांच्या असह्य विरहाशी ..
जेव्हा झेलतो घाव कडवट नकारांचे ..
जेव्हा नजरेतून भळभळत राहतात
निसटल्या क्षणांचे स्पर्श,,,
जेव्हा माझ्या विश्वासाच्या फुटक्या काचा
तुडवाव्या लागतात रक्ताळल्या पावलांनी
जेव्हा मैलोन मैल मी चालून जातो
एकटे पणाचं अफाट वाळवंट...
जेव्हा मी हरतो नियतीने फेकलेल्या फाशानी..
तेव्हा... माझी कविता जन्माला येते...
पण.....
कधीकधी..
माझ्या बाळाच्या इटुकल्या जिवणीत पसरतं मला ओळखल्याचं हासू.
नाकाला साद घालतात तू माळलेली  फुलं ...
खिडकीला नाक टेकवून मी पाहत राहतो बाहेरच्या काचेवर उतरणा-या  पाउस धारा
आणि मोजत राहतो मिट्ट काळोखातल्या चांदण्याच्या  गारा.
जेव्हा पडतो कानावर कुमारांचा मालकंस...
आणि आकाशात असते तुझ्या इतकी  रेखीव चंद्रकोर..
सायसाखरे गत दाट  होणारी तुझी मिठी आणि गाणं  असतं ओठी...
जेव्हा पाहतो मी अंगणातल्या रातराणीला लागलेलं सोळावं वरीस...
मला वाटतं ...............तेव्हाही माझी कविता जन्माला येते....


No comments: